एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
By हेमंत बावकर | Updated: November 5, 2025 12:40 IST2025-11-05T12:37:48+5:302025-11-05T12:40:04+5:30
State Transport, ST Bus: एसटी बसच्या चालकाने आणि वाहकांसह सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे.

एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
- हेमंत बावकर
कार्तिकी एकादशीला फलटण आगारातून पंढरपुरला निघालेल्या एसटी बसच्या चालकाने आणि वाहकांसह सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक जास्त असूनही प्रवासी अत्यवस्थ झाल्याचे समजताच एसटी चालकाने प्रसंगावधान राखत वेगाने नातेपुते गाठत प्रवाशाला वाचविले आहे. प्रवाशांनी संकटात विठ्ठलच धावून आला, असे म्हणत या चालक आणि वाहकाचे आभार मानले आहेत.
आज एसटी संकटात आहे, अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत. तरीही एसटीचे कर्मचारी आपले काम करत असतात. कार्तिकी एकादशीला फलटणच्या आगाराची एसटी बस सकाळी पंढरपूरला निघाली होती. यामध्ये एमएसईबीचे माजी अधिकारी भरत भोसले देखील पंढरपूरल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले होते. बरडच्या पुढे जाताच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहप्रवाशाला त्यांनी आपली तब्येत बिघडत असल्याची कल्पना दिली. त्याने एसटीच्या वाहकाला गाठत त्याला भोसले यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले.
वाहकाने प्रसंगावधान राखत चालकाला याची माहिती दिली. बरड ते नातेपुते हे अंतर साधारण २४ किमीचे आहे. या दिवशी रस्त्यावर वर्दळही नेहमीपेक्षा जास्त होती. प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी चालक आणि वाहकाने काहीशी वेगाने गाडी हाकली आणि नातेपुते गाठले. नातेपुतेच्या स्टँडवर गाडी येताच रिक्षा चालकाला गाठून सहप्रवाशांच्या मदतीने चालक, वाहक यांनी प्रवासी भोसले यांना वैद्यकीय मदत मिळण्याची सोय केली. या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.
रिक्षाचालकाने नातेवाईकांशी साधला संपर्क...
एसटीचा प्रवासी अत्यवस्थ अवस्थेत रिक्षात बसला होता, रिक्षाचालक हॉस्पिटलमध्ये नेत होता, तेवढ्यात प्रवाशाच्या पुतण्याचा फोन मोबाईलवर आला. रिक्षाचालकाने लागलीच रिक्षा थांबवून त्यांना याची माहिती दिली. सुदैवाने दुसरा पुतण्या डॉक्टर होता, रिक्षावाल्याला त्याने एका डॉक्टरकडे त्यांना नेण्यास सांगितले. त्या हॉस्पिटलला संपर्क साधून डॉक्टरांना याची कल्पना देण्यात आली होती. सर्व वेळ साधून आल्याने व या सर्वांच्या प्रयत्नाने आपले प्राण वाचल्याचे सांगत भोसले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.