“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:09 IST2025-09-25T17:04:34+5:302025-09-25T17:09:10+5:30
Peta India Madhuri Mahadevi Elephant Social Post: पेटा इंडियाने कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबद्दल एक सोशल मीडियावर पोस्ट केली असून, वनतारा येथेच ठेवण्याचे समर्थन केले आहे.

“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
Peta India Madhuri Mahadevi Elephant Social Post:कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील 'माधुरी हत्ती'ला वनतारा येथे पाठवण्यात आले. याविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन केले. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही कार्यवाही करत असल्याचे वनताराकडून सांगण्यात आले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यातच पेटा इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत महादेवी हत्तीणीला जिथे आहे, तिथेच राहू द्यावे, असे म्हटले आहे.
पेटा इंडियाने सोशल मीडियावर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची २०२२ मधील ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. एका मिरवणुकीदरम्यान माधुरी हत्तीणीने माणसावर हल्ला केल्याचे यात दिसत आहे. सध्या माधुरी ज्या ठिकाणी आहे, तिकडे ती सुखरूप आहे आणि तिची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मात्र, ती ज्या मठात होती, त्या मठातील नागरिकांना अजूनही तिला साखळदंडात बांधलेले पहायचे आहे, म्हणून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
मठात यांत्रिक हत्तीचा वापर करावा
१३ मे २०२२ रोजी धार्मिक मिरवणुकीदरम्यान हत्तीणी माधुरी (महादेवी) एका माणसावर हल्ला करतानाचे अस्वस्थ करणारे फुटेज पेटा इंडिया प्रसिद्ध करत आहे. व्हिडिओमध्ये संधिवात आणि इतर वेदनादायक आजारांनी ग्रस्त असलेल्या माधुरीला माणसांना पाठीवर घेऊन जाण्यास भाग पाडले. तिला शस्त्राने शिक्षा केली जाते. ३३ वर्षांच्या एकाकी आयुष्यानंतर महादेवी/माधुरीला अखेर एका अभयारण्यात शांतता आणि सहवास मिळाला. पण ज्या मठातून तिला ताब्यात घेण्यात आले होते, ते मठ महादेवीला साखळदंडात आणि मिरवणुकांमध्ये आणण्यासाठी मोहीम राबवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांना विनंती आहे की, कृपया हत्तीणी माधुरीला अत्यंत आवश्यक असलेल्या निवृत्तीतच ठेवा. मठात यांत्रिक हत्तीचा वापर करावा, असे पेटा इंडियाने इस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, 'माधुरी हत्ती' परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची गुजरातमधील 'वनतारा' प्रशासनाने दखल घेतली. वनताराचे सीईओंनी कोल्हापुरात येऊन महास्वामी यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील याचिकेला आम्हीही पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून नांदणीमध्ये माधुरी हत्तीसाठी वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर 'माधुरी' पुन्हा नांदणीत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आता पेटा इंडियाने हत्तीला वैद्यकीय सेवा देण्यासाठी महाराष्ट्रात एकही सुसज्ज केंद्र नसल्याचे म्हटले होते.