लोक तुटून पडले! गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात तब्बल ८६,८१८ गाड्या विकल्या गेल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 20:23 IST2025-04-01T20:22:07+5:302025-04-01T20:23:21+5:30
Vehicle Sale in Maharashtra: गेल्या वर्षी गुढी पाडव्याला फारसा उत्साह दिसून आला नव्हता. परंतू यंदा मात्र लोक तुटून पडले होते.

लोक तुटून पडले! गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात तब्बल ८६,८१८ गाड्या विकल्या गेल्या
यंदाचा गुढी पाडवा ऑटो कंपन्यांसाठी खास बनून गेला आहे. एकाच दिवशी महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक गाड्या विकल्या गेल्या आहेत. यात बजाज ऑटोने बाजी मारली आहे. बजाजने या दिवशी राज्यात तब्बल 26,938 गाड्या विकल्या आहेत. यामध्ये 6,570 या नुसत्या चेतक आहेत. आरटीओनुसार राज्यात एका दिवसात रेकॉर्डब्रेक ८६,८१८ गाड्या विकल्या गेल्या आहेत.
१ एप्रिलच्या पूर्वसंध्येला मोठी डील झाली; निस्सान इंडिया या कंपनीच्या मालकीची झाली, आता...
गेल्या वर्षी गुढी पाडव्याला फारसा उत्साह दिसून आला नव्हता. परंतू यंदा मात्र लोक तुटून पडले होते. यंदा चारचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. २२,०८१ कारची गुढी पाडव्यासाठी नोंदणी झाली आहे. तसेच पाडव्याच्या दिवशी ५१,७५६ दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यात बजाजचा वाटा निम्मा आहे.
याचबरोबर सर्वाधिक वाहनांची नोंदणी झालेल्या आरटीओ कार्यालयांमध्ये पुण्याने बाजी मारली आहे. पुणे आरटीओकडे ११,०५६ वाहनांची नोंदणी करण्यात आली. तसेच दुसरा क्रमांक पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयाने पटकावला आहे. इथे ६,६४८ वाहनांची नोंदणी झाली. नाशिक आरटीओमध्ये ३,६२६ वाहनांची नोंदणी तर मुंबई (मध्य) आरटीओकडे ३,१५४ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यानंतर ठाणे आरटीओचा नंबर लागत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20,739 जास्त वाहने विकली गेली आहेत. ही वाढ जवळपास ३१ टक्के एवढी मोठी आहे. याचा फायदा ऑटो कंपन्यांना झालाच आहे, परंतू बँकांचेही नशीब फळफळले आहे. कर्ज प्रक्रिया शुल्क आणि वाहन कर्जावरील व्याज आदींमुळे बँकांची देखील तिजोरी भरणार आहे. आजकाल बहुतांश वाहने ही कर्जावरच घेतली जातात. तसेच आरटीओकडेही मोठा महसूल जमा झाला आहे. वाहनांची विक्री एकाएकी वाढल्याने त्याचा परिणाम पुढील महिन्यात कंपन्यांच्या विक्री घसरण्यावरही होणार आहे.