मुंबई : राज्यासह देशात सर्वच राजकीय पक्षांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची तयार सुरू केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. मुंबईत माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी यांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत तर बाबा सिद्धिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच, काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवी यांनीही आज काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला.
याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. जे लोक काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना त्यांचे भविष्य दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहाता त्याठिकाणी अस्वस्थता आहे. भाजपा राष्ट्रीय स्तरावर वाढणारी पार्टी आहे. भाजपामध्ये काम करण्याची संधी आहे. देशाचे भविष्य आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे नेतृत्व महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अनेकजण भाजपामध्ये येण्याच्या तयारीत आहेत. निवडणुका जवळ आल्याने आणखी बरेच लोक भाजपमाध्ये प्रवेश करणार आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले. याशिवाय, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये सीएए कायद्याला विरोध होत आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातील सरकारे अडथळे निर्माण करतील हे स्वाभाविक आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मंगळवारी रात्री भाजपा नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. संजय निरूपम हे काल रात्री भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, संजय निरुपण यांनी वेगळा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीला याचा फटक बसू शकतो. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार दिला जाणार असल्याने संजय निरुपम नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत.