पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज
By यदू जोशी | Updated: October 16, 2025 08:37 IST2025-10-16T08:36:36+5:302025-10-16T08:37:12+5:30
Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या.

पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पक्षाच्या कामाकडे लक्ष द्या, कार्यकर्त्यांची कामे करा, तुमच्या या कामगिरीचेही मूल्यांकन पक्षपातळीवर केले जात आहे हे लक्षात ठेवा अशी स्पष्ट समज भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या मंत्र्यांना दिली.
भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामांचे टार्गेट पक्षाच्या मंत्र्यांना यावेळी देण्यात आले. अनेक आमदारांच्या मतदारसंघात शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत, त्या त्यांनी तातडीने कराव्यात, असे बैठकीत सांगण्यात आले.
निवडणुकांसाठी स्वत:ला झोकून द्या, पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा
अनेक ठिकाणी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कामे तातडीने होत नाहीत. आपले सरकार असतानाही कामे तत्काळ होत नसतील तर ते योग्य नाही. प्रत्येक मंत्र्यांनी पक्षाची कामे लवकर होण्याच्या दृष्टीने व्यवस्था तयार करावी असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
पुढचे दोन महिने पूर्णपणे पक्षाला द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वत:ला झोकून द्या. पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा. पक्षात इच्छुकांची गर्दी आहे. अशावेळी बंडखोरीची शक्यता आहे. ती होणार नाही यासाठी मोर्चेबांधणी करा, असेही यावेळी सांगण्यात आले.
रा. स्व. संघाने घेतली भाजपसह परिवारातील संघटनांची बैठक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी येथील यशवंत भवन या मुख्य कार्यालयात भाजपचे निवडक मंत्री आणि संघ परिवारातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तीन तास बैठक घेतली.
भाजपतर्फे बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये उपस्थित होते. भारतीय संस्कृती व हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाण्यासंदर्भात चिंतन झाले. संघटनेने त्यांच्याकडे असलेले कार्य वाढविणे अपेक्षित आहे, असे यावेळी सांगण्यात आले.