नापिकीतून आई-वडिलांची आत्महत्या, थोरला राब राब राबला, धाकटे तिन्ही भाऊ झाले पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 10:12 IST2023-05-26T07:08:36+5:302023-05-26T10:12:51+5:30
माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.

नापिकीतून आई-वडिलांची आत्महत्या, थोरला राब राब राबला, धाकटे तिन्ही भाऊ झाले पोलिस
- ज्ञानेश्वर भाले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जगण्याचा संघर्ष करत आश्रमशाळेतून शिक्षणाची वाट निवडताना सिसोदे कुटुंबातील तिन्ही भावंडांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला गवसणी घातली. माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.
वयाच्या आठव्या वर्षीच कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर दुसरीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. परंतु, ही शाळा बंद झाली. पुढे काय करणार, या विवंचनेत असताना त्यांना परभणीतील जिजाऊ
ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत सहारा मिळाला. तिथे त्यांनी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील महिला व बालविकास विभागाच्या वसतिगृहात काम करून शिक्षणाचा प्रवाह सोडला नाही.
या दरम्यान पोलिस भरतीची जाहिरात आल्याने तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई, तर ओंकार याने परभणीत अर्ज भरला. या भावंडांच्या कष्टाचे फलित म्हणून तिघांचीही निवड झाली, हे विशेष.
पहिल्याच प्रयत्नात यश
एरव्ही स्पर्धा परीक्षेसह विविध भरतीची तयारी करताना मुलांना नोकरीसाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. परंतु, कृष्णा केशव सिसोदे (२३), ओंकार केशव सिसोदे (२१), आकार केशव सिसोदे (२१) या तिन्ही भावंडांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.
थोरला आजही सालगडी
कृष्णा, ओंकार आणि आकार लहान असतानाच आई-वडिलांनी नापिकी शेतीमुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठा भाऊ आकाश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मिळेल ते काम करून त्यांनी भावंडांना शिक्षणासाठी मदत करून मायेची ऊब दिली. आकाश आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहे.