ठाण्यातील एका एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, असा आरोप पालकांनी केला. ही घटना ३० जुलैला सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली, अशीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करत आहे.
पालकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, ३० जुलै रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.०० वाजताच्या दरम्यान शाळेच्या आवारात निळ्या कपड्यातील एका व्यक्तीने त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पंरतु, सीसीटीव्ही फुजेटमध्ये त्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून शाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच परिसरातील इतर लोकांकडूनही माहिती घेतली जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. याबाबत द हिंदूने वृत्त दिले आहे.