परमबीर सिंह अखेर मुंबईत  गुन्हे शाखेसमोर प्रकटले ! गोरेगाव खंडणी प्रकरणात सहभागाचा आरोप अमान्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:43 AM2021-11-26T06:43:47+5:302021-11-26T06:44:38+5:30

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Parambir Singh finally appears before Mumbai Crime Branch! Allegation of participation in Goregaon ransom case disclaim | परमबीर सिंह अखेर मुंबईत  गुन्हे शाखेसमोर प्रकटले ! गोरेगाव खंडणी प्रकरणात सहभागाचा आरोप अमान्य 

परमबीर सिंह अखेर मुंबईत  गुन्हे शाखेसमोर प्रकटले ! गोरेगाव खंडणी प्रकरणात सहभागाचा आरोप अमान्य 

Next

मुंबई : गेले सात महिने अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अखेर गुरुवारी मुंबईत प्रगटले. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेल्या सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. एकेकाळी परमबीर हे ज्यांचे प्रमुख होते त्याच पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपली साक्ष नोंदवण्याची नामुष्की आली.

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गुन्हे शाखेने विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी घेत तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेत अटक केली होती.  गोरेगाव येथील दाखल खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर फरारची नोटीसही चिकटवली होती. 

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून, देशातच असल्याचा दावा करत ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचे  सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिल्याने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच ६ डिसेंबरपर्यंत त्यांना अटकेचे संरक्षण मिळाले आहे. 

परमबीर यांनी आरोप फेटाळले 
गुन्हे शाखेने अग्रवालने सादर केलेल्या पुराव्यावरून परमबीर यांना प्रश्न विचारले. यादरम्यान सचिन वाझेसोबत झालेल्या संभाषणाबरोबर विविध ऑडिओ, व्हिडिओ क्लिप त्यांना दाखवण्यात आल्या. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, आपण वाझेलाही कुणाकडून पैसे घेण्यास सांगितले नाही. वाझेला अन्य कोणी सांगितले असल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी, असेही परमबीर यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. 

चांदीवाल आयोगाने दिली तंबी
परमबीर सिंग यांच्याविरुद्धचा वॉरंट आम्ही अजूनही रद्द केलेले नाही, याची जाणीव ठेवा आणि त्यांना आयोगासमोर हजर राहायला सांगा, या शब्दांत न्या. कैलास चांदीवाल यांनी परमबीर सिंह यांच्या वकिलाची कानउघाडणी केली. तसेच आयोगासमोर परमबीर सिंग हजर झाले नाहीत, तर आम्हाला पोलीस यंत्रणेचा आधार घ्यावा लागेल, असेही बजावले.

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाइल लपवला
- परमबीर सिंह यांनी २६/११ मधील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल लपवल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) समशेर पठाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तसेच परमबीर यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचेही आरोपात नमूद केले आहे. 

- २००८ मध्ये झालेल्या २६/११ नंतर यातील दहशतवादी अजमल कसाबला डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरगाव चौपाटी परिसरात अटक करण्यात आली. याबाबत माळी यांच्याशी बोलताना कसाबला पकडले तेव्हा त्याच्याकडून मोबाइल जप्त करत तो कांबळे हवालदाराकडे देण्यात आला. यादरम्यान तत्कालीन एटीएसप्रमुख परमबीर सिंह यांना त्या मोबाइलबाबत समजताच त्यांनी कांबळेंकडून तो ताब्यात घेतला. हा मोबाइल या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आहे. 
 

Web Title: Parambir Singh finally appears before Mumbai Crime Branch! Allegation of participation in Goregaon ransom case disclaim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.