दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या, पनवेल येथील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 23:07 IST2025-07-29T23:04:40+5:302025-07-29T23:07:18+5:30
पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावात दारुड्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली.

दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या, पनवेल येथील घटना!
पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावात दारुड्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी पहाटे घडली. यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नम्रता नैनित म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नम्रताने २०११ मध्ये नैनितशी लग्न केले होते. परंतु, नम्रता यांचा पती नैनितला दारूचे व्यसन लागले आणि त्याने आपला पगार दारूवर उडवायला सुरुवात केली. दारूच्या व्यसनामुळे त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले. काम बंद झाल्यानंतर नैनित यांच्या घरची परिस्थिती बिकट झाली.
नम्रता ही घरभाडे, घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून होती. दुसरीकडे, नैनित दारू पिऊन घरी आल्यानंतर नम्रताला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. शिवाय, त्याने अनेकदा शेजारी आणि घरमालकालाही शिवीगाळ केल्याची माहिती आहे.
घटनेच्या आदल्या रात्री नम्रताने तिच्या वडिलांशी फोनवर बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नैनित दारू पिऊन घरी परतल्यानंतर नम्रताने फोन बंद केला. त्यानंतर काही तासांनी नम्रताने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळाली. नैनितच्या सततच्या छळाला वैतागून नम्रताने आयुष्य संपवले, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. त्यानुसार, पोलिसांनी नैनितविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.