Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 05:59 IST2025-11-20T05:58:26+5:302025-11-20T05:59:29+5:30
Palghar Zilla Parishad School: शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार (पालघर): शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना १ किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. दूर अंतर असल्याने विद्यार्थ्यांना पाणी आणण्यास उशीर झाला. यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच, उर्वरित विद्यार्थी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही, असा आरोप पालकांकडून
होत आहे.
लोकनाथ जाधव या शिक्षकावर तत्काळ कारवाई नाही केली, तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करू.
सुभाष भोरे, उपसरपंच, ढाढरी ग्रामपंचायत. जांभूळमाथा शाळेतील शिक्षकाच्या वर्तणुकीबाबत समजले आहे. संबंधित विभागाला शहानिशा करून उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.
दर शनिवारी दांडी, शिकविण्याकडे दुर्लक्ष
शाळेत पहिली ते आठवीपर्यंत तुकड्या असून, येथील पटसंख्या ९६ आहे. शाळेची नियमित वेळ १०:३० आहे. परंतु शिक्षक लोकनाथ जाधव हे ११:३० वाजता हजेरी लावतात. मुलांना अंगणात उभे करणे, मुलांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी गैरहजर राहणे या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत.