Palghar ZP Election Results: पालघरमध्ये मनसेने खाते उघडले, मान पंचायत समितीत तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:43 IST2021-10-06T13:42:20+5:302021-10-06T13:43:51+5:30
Palghar ZP, panchayat samiti Election Results: आज सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत मनसेनेही खाते उघडले असून, पालघर पंचायत समितीच्या मान मतदारसंघामधून मनसेच्या तृप्ती योगेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Palghar ZP Election Results: पालघरमध्ये मनसेने खाते उघडले, मान पंचायत समितीत तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय
पालघर - पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायस समित्यांच्या काही मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपले उमेदवार उतरवले होते. दरम्यान, आज सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये मनसेनेही खाते उघडले असून, पालघर पंचायत समितीच्या मान मतदारसंघामधून मनसेच्या तृप्ती योगेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार मीनाक्षी सांबरे यांच्यावर १ हजार ५८ मतांनी विजय मिळवला.
अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये मान पंचायत समिती गणामध्ये शिवसेना, भाजपा, बविआ, काँग्रेस आणि मनसे अशा सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. मात्र येथे मुख्य लढत मनसेच्या तृप्ती पाटील आणि अपक्ष मीनाक्षी सांबरे यांच्यात झाली. त्यामध्ये तृप्ती पाटील यांना २३२७ मते मिळाली. तर मीनाक्षी सांबरे यांना १२६९ मते मिळाली. अशा प्रकारे तृप्ती पाटील या १ हजार ५८ मतांनी विजयी झाल्या.
या मतदारसंघात बविआच्या प्रतीक्षा चुरी ११३२ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिल्या. तर शिवसेनेच्या संपदा पाटील १ हजार ९५ मतांसह चौथ्या स्थानी राहिल्या. भाजपाच्या प्रीती आंबेकर यांना ५५९ मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार चंद्रकला गहला यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले.
पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १५ जागांसाठी मतदान झाले होते. त्यातील १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपाला ५, शिवसेना ५, राष्ट्रवादीला ४ आणि इतरांच्या खात्यात एक जागा गेली आहे. तर पालघर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीपैकी १० जागांवरील निकाल हाती लागले आहेत. त्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर इतरांच्या खात्यात चार जागा गेल्या आहेत.