Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:03 IST2025-06-15T06:02:37+5:302025-06-15T06:03:52+5:30

Newborn Dies In Mokhada: पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका सेवा नाकारण्यात आल्यामुळे एका नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Palghar: Newborn Dies In Mokhada, Father Carries Infant's Body 80 KM In Bag After Ambulance Fails To Arrive | Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट

Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मोखाडा: मृत अर्भकाला पिशवीत ठेवून त्याच्या पित्याने एसटीने गावापर्यंत प्रवास केला तेव्हा त्याच्यासोबत त्या अर्भकाची गंभीर आजारी माता अविता कवर हीसुद्धा होती, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, तिला रुग्णालयाने रुग्णवाहिकेबाबत  विचारले असता तिने सेवा नाकारली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. 

या प्रकाराची माहिती मिळताच माजी आ. सुनील भुसारा यांनी तत्काळ कवर कुटुंबीयांचे घर गाठले आणि अविता कवर यांची अवस्था पाहून त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले. अविता कवर या महिलेला प्रसूतीसाठी प्रथम खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत, त्यानंतर मोखाडा आणि तेथून नाशिक असा प्रवास करावा लागला. सरकारी आरोग्य यंत्रणेकडून रुग्णवाहिकाही मिळू शकली नाही. यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त होत आहे. 

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नाही. प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हे आरोग्य केंद्र कसेबसे चालवले जाते. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मंजूर पाचपैकी सर्वच्या सर्व वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. यामुळे एकीकडे पालघर जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवा सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला तरी येथे वारंवार होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रकार थांबविण्यात यश आलेले नाही, हेच या ताज्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

जबाबदारीही झटकली...
अविता कवर यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असताना आरोग्य यंत्रणेने तशी तसदी घेतलेली नाही. पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांनी, मृत अर्भकासाठी शववाहिका देण्याची जबाबदारी 
नाशिक जिल्हा रुग्णालयाची असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.   

नागरिक नाराज
ही घटना प्रसिद्ध झाली त्यादिवशी आ. हरिश्चंद्र भोये मोखाडा पंचायत समितीत बैठक घेत होते. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेण्याचे औदार्य दाखवले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीचे आदेश
हे प्रकरण गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी अहवाल येणार आहे. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

Web Title: Palghar: Newborn Dies In Mokhada, Father Carries Infant's Body 80 KM In Bag After Ambulance Fails To Arrive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.