"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:49 IST2025-04-30T12:46:15+5:302025-04-30T12:49:01+5:30
Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी आतातपर्यंत उचललेली पावले, यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी २७ बळी घेतले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पहलगामधील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, याबाबत आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की, पुलवामा हल्ल्यानंतरच पाकिस्तानवर हल्ला करायला हवा होता. पुलवामामध्ये ४० जवान ज्या पद्धतीने मारले गेले. आता ते मारले कुणी हा परत प्रश्न आहे. त्यात परत राजकारण येतं. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यानुसार जवानांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, असे वारंवार सांगितले जात होते. म्हणजे सरकारला त्यांना राजकारण करण्यासाठी मारायचं होतं, असं कुणी म्हटलं तर त्याला देशद्रोही ठरवतील. त्याला पाकिस्तानात चालले व्हा म्हणून सांगितलं जाईल, असा आरोपही राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही. उरीनंतर का हल्ला झाला नाही. सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो आम्ही पण गल्लीबोळात करतो बरं का, आम्ही पण असल्या स्ट्राईक करतो, असा टोलाही संजय राऊत यांनी केला. जसा हल्ला इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्री यांनी केला. त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय, असा टोलाही राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.