मालक म्हणतोय...दीड कोटी द्या; आटपाडीच्या बाजारात ७० लाखांचा मोदी बकरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:06 IST2020-11-30T01:58:17+5:302020-11-30T07:06:48+5:30
कोरोनामुळे उत्तरेश्वर यात्रा रद्द केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या-मेंढ्यांचा दोन दिवस बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला

मालक म्हणतोय...दीड कोटी द्या; आटपाडीच्या बाजारात ७० लाखांचा मोदी बकरा
आटपाडी (जि. सांगली) : आटपाडी येथील उत्तरेश्वर देवाची यात्रा कोरोनामुळे यंदा रद्द झाली आहे. मात्र, शेळ्या-मेंढ्यांचा बाजार दोन दिवस भरविण्यात येणार आहे. रविवारी अनेक जातिवंत बकऱ्यांना विक्रमी दराने मागणी आली. सांगोल्याचे शेतकरी बाबूराव मिटकरी यांच्या ‘मोदी’ बकऱ्याला तब्बल ७० लाखांची मागणी झाली. मात्र, त्यांनी या बकऱ्याची दीड कोटी किंमत सांगितली आहे.
कोरोनामुळे उत्तरेश्वर यात्रा रद्द केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेळ्या-मेंढ्यांचा दोन दिवस बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी पहिल्या दिवशी शेळ्या-मेंढ्यांचा भरगच्च बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरला. या बाजारात जातिवंत बकरी आणि मेंढ्यांची लाखो रुपयांत खरेदी-विक्री झाली. सांगोला (जि. सोलापूर) येथून आलेल्या मिटकरी यांचा ‘मोदी’ हा जातिवंत बकरा बाजाराचे आकर्षण ठरला. या बकऱ्याला तब्बल ७० लाखांची मागणी झाली. मात्र, मिटकरी यांनी या बकऱ्याची दीड कोटी किंमत सांगितली आहे.
पांढऱ्या रंगाचा आणि करड्या ठिपक्यांचा
पांढऱ्या रंगाचा आणि करड्या रंगाचे ठिपके असलेला हा बकरा लक्ष वेधून घेत आहे. बाजाराला माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, संचालक विष्णू अर्जुन, सरपंच वृषाली पाटील, संचालक पंढरीनाथ नागणे यांनी भेट दिली.बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदीसाठी पुणे, गोवा, कोल्हापूर, सांगली येथून मोठ्या संख्येने व्यापारी आले होते.