Over 100% Sowing of Rabbi: Good picture in Marathwada-Vidarbha | रब्बीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पेरण्या : मराठवाडा-विदर्भात चांगले चित्र 

रब्बीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पेरण्या : मराठवाडा-विदर्भात चांगले चित्र 

ठळक मुद्देगेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम 

पुणे : अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे यंदा जलसाठे तृप्त झाल्याने रब्बीची पेरा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर असून, यंदा ५७ लाख ६४ हजार हेक्टरवर (१०१ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. हरभरा, गहू, मका या पिकांचे क्षेत्र वाढल्याने भरगोस उत्पादन होईल. 
गेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी झाली नव्हती. यंदा रब्बीचा पेरा जास्त झाला आहे. नाशिक विभागामधे रब्बीचे सरासरी क्षेत्र ४.३१ लाख हेक्टर असून, ५.२८ लाख हेक्टरवर, औरंगाबादमधे ७.७२ लाख हेक्टरवरुन साडेनऊ लाख हेक्टरवर आणि लातूर विभागातील क्षेत्र ६.४७ लाख हेक्टरवरुन ७.५६ लाख हेक्टरवर वाढले आहे. नागपूर विभागामधे ४.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. 
कोकणात २९ हजार हेक्टरवर, पुणे विभाग ११.८५ लाख हेक्टर आणि कोल्हापूर विभागात ४.४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, ११ लाख ६५ हजार ८१६ हेक्टरवर, मक्याची २ लाख ६७ हजार ३५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २२ लाख ७१ हजार ३१६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. करडई, जवस, तीळ आणि सुर्यफूल या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्यात ४० हजार हेक्टरपर्यंत घट झाली आहे. 
------
ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम 
राज्यात ज्वारी हे रब्बी हंगामाचे मुख्य पीक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. यंदा देखील त्यातील सातत्य कायम राहिले. ज्वारीचे क्षेत्र गहू, मका आणि हरभरा पिकाकडे वळत असल्याचे दिसून येते. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर (७१ टक्के) पेरणी झाली आहे. 

Web Title: Over 100% Sowing of Rabbi: Good picture in Marathwada-Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.