चला,पंतप्रधानांकडे तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 16:42 IST2020-11-25T16:31:46+5:302020-11-25T16:42:41+5:30
तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.

चला,पंतप्रधानांकडे तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली: देवेंद्र फडणवीस
पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात कुठलाही समन्वय दिसत नाही. या तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. परंतु, सरकार मनमानी कारभार करत असेल,भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. पण चला पंतप्रधानकडे तक्रार करण्यापूरते तरी आमच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले,कोरोना काळात राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे. आश्वासने पूर्ण न करणे, अतिवृष्टी नुकसान घोषित भरपाई मिळाली नाही. पंचनामेही झाले नाहीत. विजेच्या सवलतीबाबत घुमजाव केले. कामांना स्थगिती देणे हेच या ठाकरे सरकारचे काम आहे. एक वर्षात एकही उपलब्धी नाही. कोरोनाबाबत सरकारने केलेले काम, साहित्य खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. पण राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. सरकार पडेल यांच्याकडे लक्ष लावून आम्ही निश्चित बसलेलो नाहीत. पण राज्यातले हे अनैसर्गिक सरकार, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी आम्ही राज्याला सक्षम पर्याय देऊ..
आमचे उमेदवार संग्राम देशमुख विजय होतील. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक तीन दिवस दौरा केला. चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगली नोंदणी झाली आहे. तसेच राज्य सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष बघायला मिळतो आहे. त्यामुळेच संघटित होऊन पदवीधर निवडणुकीत भाजपला मतदान करणार आहे. टक्का अनुदान काढण्यास या सरकारने वेळ लावला. शिक्षकांची वेळ ही बदलली. सरकारचा रोष दिसेल,या निवडणुकीत विजय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.