'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:25 IST2019-12-04T11:22:06+5:302019-12-04T11:25:27+5:30
शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते.

'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'
मुंबई : सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे उद्धव ठाकरे यांनी आता चालढकल केल्यास त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इतर निर्णय ज्या वेगाने घेतली जात आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत याचे उल्लेख केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला जाणार असल्याचे सर्वांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.
'देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही', असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी वर्तवलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला.