विश्वास पाटील यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीला विरोध, साताऱ्यातील लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:11 IST2025-09-16T12:09:34+5:302025-09-16T12:11:52+5:30
विश्वास पाटील म्हणाले..

संग्रहित छाया
सातारा : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची रविवारी निवड झाली. त्यांचे साहित्य हे त्यांच्याच भावाचे आहे. ऐतिहासिक कादंबरीशिवाय प्रभावीपणे मराठीत त्यांचे साहित्य नाही. त्यामुळे त्यांची निवडीचा निषेध व विरोध करीत आहे, अशी भूमिका साताऱ्यातील काही लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक कादंबऱ्या या बऱ्याच अंशांनी कल्पनेचा धांडोळा घेतलेल्या असतात. असे साहित्य बऱ्याच अंशाने विषमतावादाचा, वंशवादाचा आणि जातीय मानसिकतेची मांडणी करणारी असतात. त्यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीला विरोध आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लेखक पार्थ पोळके, शिवाजी राऊत, विजय निकम, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, अस्लम तडसरकर, बाळासाहेब सावंत, प्रा. दत्ताजीराव जाधव, सिद्धार्थ खरात, संजय नीतनवरे यांच्या निवडीला विरोध व निषेधाच्या पत्रकावर सह्या आहेत.
त्या प्रवृत्तीचे पाटील समर्थक..
साताऱ्याचे थोरले प्रतापसिंह महाराज यांची वेदोक्त प्रकरणात ज्या प्रवृत्तीने बदनामी केली. त्या प्रवृत्तीचे विश्वास पाटील हे समर्थक आहेत. म्हणून आम्ही प्रागतिक साहित्य पंचायतीच्या वतीने पाटील यांच्या निवडीचा निषेध करतो, असे प्रसिद्धीपत्रकात पार्थ पोळके यांनी म्हटले आहे.
माझ्या प्रशासकीय कारकिर्दीविषयी चौकशी सोडा, साधी मला शासनाची नोटीसही नाही. मी दुसऱ्याचे साहित्य घेतल्याचा एकही पुरावा नाही. कारण वयाच्या २४ वर्षी मी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर क्रांतिसूर्य ही कादंबरी लिहिली. वयाच्या ३० व्या वर्षी झाडाझडती लिहिली. त्या कादंबरीतील नायक खैरमुडे गुरुजी हे दलित समाजाचे आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर संशोधन केले. माझे वडील शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या विचाराचे कार्यकर्ते होते. असा समृद्ध पुरोगामी वारसा मला असताना जातीयवादाचे आरोप करणे चुकीचे आहे. माझ्यावरील कोणत्याही आरोपात तथ्य अथवा पुरावा नाही. - विश्वास पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा.