'महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 17:06 IST2024-01-25T17:04:40+5:302024-01-25T17:06:09+5:30
Vijay Wadettiwar Criticize Maharashtra Government: दोन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ ओबीसी मंत्र्याला महायुतीचे सरकार ध्वजारोहणाचा मान देत नाही. महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना केली जात आहे. अशी खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

'महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही. दोन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ ओबीसी मंत्र्याला महायुतीचे सरकार ध्वजारोहणाचा मान देत नाही. महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना केली जात आहे. अशी खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे बळ कमी झालं कि, कमी केलं जातंय असा प्रश्न पडतो आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना दिलेली वागणूक स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांना डावलने हे काही नवीन नाही. या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा वाटेला अशीच वागणूक येणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. ओबीसी मंत्री छगन भुजबळांचे सरकार मधील बळ किती आहे, हे आज राज्यातील जनतेला महायुती सरकारने दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारचे ओबीसी प्रेम हे ढोंगी आहे. हे यावरून स्पष्ट होते, असे खडेबोल वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत.