सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 05:24 IST2025-05-10T05:24:19+5:302025-05-10T05:24:52+5:30

कुणाचं लग्न उरकलं, कुणाचं लग्न ठरलं... सुट्टीवर आलेल्या जवानांचे अचानक फोन खणाणले, ‘कर्तव्यावर हजर व्हा’ असे आदेश मिळाले अन् मेहंदीचे हात बंदुका पेलण्यासाठी सज्ज झाले...

Operation Sindoor: My love, I am leaving... I am waiting for you to come back; Sending mehndi hands to 'Sindoor' indian army personnel call | सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी

सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी

- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क 
बीड : ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलात साक्षगंध कार्यक्रम झाला. मुलगी तिच्या गावी गेली. सुट्ट्याही आणखी काही दिवस बाकी होत्या. असे असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाची बातमी समजली. मध्यरात्रीच कॉल आला आणि बीडचा करण सूर्यकांत महाजन हा देशसेवेसाठी रवाना झाला. हवाई दलात तो फ्लाइंग ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत महाजन यांचा मुलगा करण याने आयआयटीमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. आपणही भारतीय सैन्य दलात काही करून दाखविले पाहिजे, अशी आवड त्याच्या मनात निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर होणाऱ्या सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेची २०१६ पासून करणने तयारी सुरू केली. 

लग्नाच्या तारखेवर चर्चा
डिसेंबर २०१७ मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली. तो सहा महिन्यांतून १ महिना सुट्टीवर गावी येत असे. आताही तो १४ एप्रिलला सुट्टीवर आला होता.
त्याचे हाॅटेल मॅनेजमेंट करणाऱ्या महेक नेब ( भिलाई, छत्तीसगड) हिच्याशी ३ मे रोजी बीडमधील एका हॉटेलमध्ये साक्षगंध झाले. लग्नाची तारीख ठरविण्याची चर्चा सुरू असतानाच मध्यरात्रीच करणला कॉल आला. कसलाही विचार न करता पहिल्या विमानाने तो रवाना झाला. 

नवरदेवाचा पोषाख काढला; वर्दीला वंदन करून निघाला

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेचे सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे यांनी देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे. लग्न होऊन आठवडा उलटत नाही तोच सैन्यदलाकडून आलेली तातडीने हजर राहण्याची सूचना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वीकारली आणि साक्षात गणवेशाला वंदन करत सीमेकडे प्रयाण केले. 

कृष्णा अंभोरे यांचे लग्न दि. २ मे रोजी पार पडले. संसाराच्या नव्या प्रवासाची सुरुवात होत असतानाच, सैन्यदलाकडून त्यांना तातडीने हजर होण्याची सूचना मिळाली. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांतच अंगावर गणवेश चढवून देशरक्षणासाठी सीमेवर जाण्याची वेळ आली. त्यांनी आनंदाने हा आदेश स्वीकारला आणि दि. ९ मे रोजी शुक्रवारी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी रवाना झाले. कृष्णा घरातून निघताना त्यांच्या डोळ्यांत अभिमान आणि आत्मिक शांतता होती. मात्र, त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. त्या अश्रूंमध्ये नवरा देशसेवेसाठी निघाल्याचा अभिमान होता. सैनिकी ड्युटी, विशेषतः सीमावर्ती भागात, ही केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, एक संकल्प आहे.

देशसेवेला दिले प्राधान्य 
कृष्णाने आपल्या संकल्पासाठी वैयक्तिक सुख, नवा संसार आणि कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून देशसेवेला प्राधान्य दिले.
त्यांचा हा निर्णय आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे. कृष्णा अंभोरे यांच्या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली.

ग्रामस्थांचे डोळे पाणावले
कृष्णा देशसेवेसाठी निघाले, तेव्हा गावातील वातावरण भावनिक झाले होते. त्यांना निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी वाशिम रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ‘जय जवान’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता. गावातील आबालवृद्धांनी त्यांना सॅल्युट करत अभिमानाने निरोप दिला.

Web Title: Operation Sindoor: My love, I am leaving... I am waiting for you to come back; Sending mehndi hands to 'Sindoor' indian army personnel call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.