रवींद्र जगधने
पिंपरी (पुणे) : वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करू नये, असे आदेश शासनाने दिले असतानाही ऑनलाइन औषध विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या नावाने केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी औषधे मागविली. अन्न व औषध प्रशासनास औषधांच्या पुराव्यासह संघटनेने सोमवारी तक्रार केली आहे.
तापकीर यांनी दिनांक ११ ऑक्टोबरला एका पोर्टलवर औषधे मागविण्यासाठी नोंदणी केली. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करणे आवश्यक असते. तापकीर यांनी ‘जेमिनॉर एम १’, ‘केटोटस सस्पेन्शन’, ‘नॅसेलिन नेझल स्प्रे’, ‘पॅनरक्स ४०’, ‘रायनोरिस्ट फोर्ट टॅब्लेट’ या पाच औषधांची नावे दिली, मात्र प्रिस्क्रिप्शन अपलोड केले नाही. तसेच ‘नरहरी झिरवळ, तुळजाभवानी मंदिर, काळेवाडी, पुणे १७’ असा पत्ता दिला व ४२८ रुपये रुपये बिल ऑनलाइन दिले. त्यानंतर रविवारी दुपारी चार वाजता ही औषधे त्यांना घरपोच मिळाली.
कार्यालयात औषधे नेलीऔषधे घरपोच मिळाल्यानंतर तापकीर हे संबंधित औषधे घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या मोशीतील कार्यालयात सोमवारी दुपारी एकला पोहोचले आणि ऑनलाइन आलेले औषधांचे पाकीट उघडून दाखविले आहे आणि लेखी तक्रार केली आहे.
तक्रार आली; चौकशी होईलया प्रकरणी संबंधित तक्रार आली आहे. त्यानुसार चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.