भिवंडीत प्रॉपर्टी वादातून एकाचा खून ;सात जणांना अटक
By Admin | Updated: April 18, 2017 22:07 IST2017-04-18T22:07:49+5:302017-04-18T22:07:49+5:30
राहत्या घरासमोरील खोल्यांची जागा गाडीच्या पार्किंगसाठी देण्यास नकार दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने संगनमताने

भिवंडीत प्रॉपर्टी वादातून एकाचा खून ;सात जणांना अटक
>ऑनलाइन लोकमत
भिवंडी दि.18 - राहत्या घरासमोरील खोल्यांची जागा गाडीच्या पार्किंगसाठी देण्यास नकार दिल्याच्या रागातून शेजाऱ्याने संगनमताने जागा मालकाचे अपहरण करून त्यास जीवे ठार मारल्याची घटना काटेकरनगर येथे घडली आहे. बाळकृष्ण लक्ष्मण सोन्ने ( 26) असे ठार केलेल्या इसमाचे नाव आहे.
त्याच्या मालकीच्या काटेकरनगर येथे असलेल्या चार खोल्या त्याने विकत द्याव्यात असा तगादा शेजारी जितेंद्र चंद्रकांत टेकळे व त्याची पत्नी दक्षता टेकळे यांनी लावला होता. मात्र त्यास बाळकृष्ण याने नकार दिला होता.त्यावरून या दोन्ही कुटुंबात सहा महिन्यांपासून धुसफूसही सुरु होती.तर या रागातून दक्षता हिने चार महिन्यांपूर्वी बाळकृष्णवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता.सर्व प्रयत्न करूनही बाळकृष्ण जागा देत नसल्याने त्याचा कायमचा काटा काढून त्याला संपवायचे असा कट रचून जितेंद्र व पत्नी दक्षता या दांपत्याने अन्य साथीदारांच्या मदतीने बाळकृष्ण कामावरून घरी परतत असताना त्यास मध्यरात्री गणेश मंदिरासमोर गाठले व धारदार शस्त्राने मारहाण करून त्यास जीवे ठार केले व खड्यात टाकून पळून गेले.
रात्री उशीर झाला तरी बाळकृष्ण घरी आला नसल्याने पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता त्याला मैत्री डेव्हलपर्सचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी फेकून दिल्याचे दिसून आले.या खून प्रकरणी नारपोली पोलिसांनी जितेंद्र टेकळे ,दक्षता टेकळे ,नितिन गायकवाड ,अभिजित टेकळे ,शुभम चव्हाण ,रोहित मधुकर पवार ,प्रविण अभिमन्यू बनसोडे सर्व रा.काटेकर नगर या सात जणांना गजाआड करून न्यायालयात हजर केले असता या सर्वांना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.