लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:09 IST2019-04-10T18:04:09+5:302019-04-10T18:09:23+5:30
मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे.

लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू
डोंबिवली - मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवेश न मिळाल्याने दरवाजाला लटकून प्रवास करणा-या रविकांत भगवान चाळकर (४५) यांचा आज सकाळी धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. रविकांत चाकळर हे पलावासीटी, काटई, डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी होते.
रविकांत चाळकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल पकडण्यासाठी डोंबिवली स्थानकात आले होते. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना चढता आले नाही. त्यामुळे ते ते दरवाजाला लटकून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांचा तोल गेला आणि ते डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडले. हा अपघात सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात अधिक माहित देताना डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, ''अपघात झाल्यानंतर सहप्रवाशांनी तातडीने चेनखेतरत लोकल थांबवली, त्यानूसार लोहमार्ग पोलिसांनी आणि त्या इसमाच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डोक्याला प्रचंड मार लागल्याने रक्तस्त्राव झाला होता. तेथे उपचार करण्यासाठी नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.''
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत इसम हे मुंबई न्यायालयात क्लार्क पदावर कार्यरत होते. या अपघातासंदर्भात मयताच्या मित्रांनीच त्यांच्या घरी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार मयातची आई, पत्नी, मुलगी असा परिवार घटनास्थळी आला होता. मयताची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. गर्दीचा बळी गेल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त झाली. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असून, डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.