जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:25 IST2025-12-13T19:02:40+5:302025-12-13T19:25:32+5:30
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे अत्यंत अव्यवहार्य उपाय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Ajit Pawar on Ganesh Naik: महाराष्ट्रात बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील मुक्त संचार आणि वाढते हल्ले ही एक गंभीर समस्या बनली असताना, यावर वनखात्याने सुचवलेल्या उपायांमुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडण्याचा जो प्रस्ताव मांडला होता, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत, हा निर्णय अत्यंत हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यावर उपाययोजना करताना प्रशासकीय पातळीवर गंभीरतेचा अभाव असल्याचे मत अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत व्यक्त केले.
एक कोटींच्या शेळ्या सोडण्याच्या प्रस्तावावर नाराजी
वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबटे मानवी वस्त्यांमध्ये येत असल्याने, त्यांच्यासाठी जंगलात भक्ष्य उपलब्ध नाही, असे कारण पुढे केले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांसाठी गळ्यात टॅग लावून शेळ्या किंवा बकऱ्या जंगलात सोडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. याच कल्पनेवर अजित पवार यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हा अत्यंत अव्यवहार्य उपाय आहे आणि हा निर्णय हास्यास्पद आहे. बिबट्यांच्या तातडीच्या समस्येवर अशा दीर्घकालीन आणि अव्यवहार्य उपाययोजना सुचवल्या जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
बिबट्यांची संख्या आणि वनताराची अडचण
अजित पवारांनी राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात बिबट्यांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असण्याची दाट शक्यता आहे. बिबट्यांना पकडून वनतारा सारख्या ठिकाणी हलवण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी वास्तव मांडले. वनताराने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले आहे की, ते ५० हून अधिक बिबट्यांना सामावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व बिबट्यांना पकडून वनतारात सोडण्याची चर्चा प्रत्यक्षात अमलात आणणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बिबट्यांची नसबंदी हा पर्याय चर्चेत असला तरी, त्याचे परिणाम दिसायला अनेक वर्षांचा मोठा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात बिबट्यांचा वाढता हैदोस
राज्यातील कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे यांसह विविध ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बिबट्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मानवी वस्तीच्या जवळ बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. लहान मुले, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक हे हल्ल्यांचे बळी ठरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
'बिबट्यांना आफ्रिकेला पाठवा' या वक्तव्यावरही वाद
या सर्व गोंधळात वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना आफ्रिकेला पाठवण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात आणखी भर पडली. ज्या भागांत बिबट्यांची संख्या जास्त आहे, तेथील बिबटे आफ्रिकेला हलवण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आफ्रिकेत वाघ आणि सिंह आहेत, पण बिबटे नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे तिकडे पाठवण्याबाबत केंद्रीय वनखात्याकडे विचारणा केल्याचा त्यांचा दावाही आश्चर्यकारक ठरला आहे.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या टीकेवर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. "ठीक आहे, अजित पवार यांच्याशी बोलू," असं गणेश नाईक यांनी म्हटलं.