चिनी मालाने भारतीय बाजारपेठ भरलेली आहे. प्लॅस्टिकची खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू इथवर ठीक होते. पण आता खाण्याचे पदार्थ, फळेही चीनमधून भारतात येऊ लागली आहेत. आता तर नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात चिनी द्राक्षांची आयात झाली आहे. भारतीय द्राक्षांना घेताना मोलभाव करणारे चिनी द्राक्षे घेताना दुप्पट पैसे देऊन घेत असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या विविध देशातील द्राक्ष दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या चीन मधून द्राक्ष एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहेत. भारतीय द्राक्षांपेक्षा चीनच्या द्राक्षांना चांगली चव असल्यामुळे लोकांची या द्राक्ष खरेदीला जास्त पसंती आहे.
किंमतीची तुलना केल्यास भारतीय द्राक्षे किलोला १२० ते १५० रुपयांना विकली जात आहेत. तर चिनी द्राक्षे ही ३०० रुपयांना किलो विकली जात आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये महिन्याभरात या द्राक्षांचे दहा ते पंधरा कंटेनर दाखल होत आहेत. परदेशी द्राक्षांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.