'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:57 PM2024-02-21T15:57:42+5:302024-02-21T16:00:02+5:30

मनोज जरांगेंच्या या भूमिकेवर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

OBC leader Babanrao Taiwade has reacted to this role of Manoj Jarange Patil. | 'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

सरकारने सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले?, असा सवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी विचारला. तसेच आणखी १-२ दिवस तुमच्याकडे आहेत, २४ तारखेपासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल, अशी घोषणा देखील मनोज जरांगे यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी निवडणूक आयोगाकडे, निवडणुका न घेण्याची विनंती केली आहे. 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, आयोगाने निवडणूक घेतली तर प्रचाराची गाडी ताब्यात घ्या, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे. मनोज जरांगेंच्या या भूमिकेवर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मनोज जरांगे मोठे आंदोलन उभारणार असा इशारा देत आहेत. मात्र, सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे. तसेच निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद आहे. निवडणूक देशाची आहे. एखाद्या समूहाच्या मागणीने निवडणुका थांबवता येत नाहीत. आंदोलनात गावात आलेल्या गाड्या जप्त करा, नेत्यांना गावबंदी करा, वृद्धांना आंदोलनात उतरवा असे म्हणणे योग्य नाही. अशा आंदोलनामुळे समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर कोण जबाबदार राहणार?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला आहे.

...ती शिंदे-फडणवीस यांची जबाबदारी राहील- मनोज जरांगे

जरांगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सर्वपक्षीय नेत्यांनाही इशारा दिला आहे. २४ फेब्रुवारीपासून आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असून एकाही नेत्याने आमच्या घरापर्यंत येऊ नये, आमच्या वावरातून कुणीही जाऊ नये, असे म्हणत राजकीय नेत्यांना इशाराच दिला आहे. राज्यातील वृद्धांनाही उपोषण करण्याचं आवाहन जरांगेंनी केलं असून वृद्धांनी उपोषणाला बसावं, एका रांगेत उपोषण करावं, असे त्यांनी म्हटले. तसेच, उपोषण करताना एकाचा जरी जीव गेला तरी, ती शिंदे-फडणवीस यांची जबाबदारी राहील, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: OBC leader Babanrao Taiwade has reacted to this role of Manoj Jarange Patil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.