‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 07:46 IST2025-02-12T07:46:34+5:302025-02-12T07:46:55+5:30

बाधित होणाऱ्या खऱ्या जमीनधारकांना एमएमआरडीएचे अधिकारी डावलून बैठका बोलावून चर्चा करीत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Nuapada village Angry on MMRDA officials to task for calling unrelated people for the necessary survey and measurement | ‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

उरण - करंजा ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतूला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वाधिक जमीन, जागा नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत आहे. असे असतानाही मंगळवारी भूसंपादन आवश्यक सर्वेक्षण, मोजणीसाठी संबंध नसलेल्या लोकांना बोलावल्याने संतप्त नवापाडा ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

रेवस-करंजा पूल दृष्टिपथास येऊ लागला आहे. मात्र, जोपर्यंत शेतकरी, जमीनधारकांना विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा होत नाही, मोबदला ठरत नाही तोपर्यंत सर्वेक्षण, मोजणीसाठी ग्रामस्थांच्या विरोधामुळे या पुलाच्या जोडरस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्याशिवाय बाधित होणाऱ्या खऱ्या जमीनधारकांना एमएमआरडीएचे अधिकारी डावलून बैठका बोलावून चर्चा करीत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

... तर न्यायालयात जाण्याचा इशारा
मोजणीसाठी आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नवापाडा ग्रामस्थांना डावलूनच कामाला सुरुवात केली होती. ही बाब समजताच नवापाडा ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएचे उपअभियंता अनिरुद्ध बोराडे यांची भेट घेतली. मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी नवापाडा ग्रामस्थांची सर्व्हे नं. २२-१ मधील आठ एकरहून अधिक जमीन पुलाच्या जोड रस्त्यासाठी बाधित होत आहे. पुलाच्या जोडरस्त्यासाठी सर्वाधिक जमीन नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत असताना त्यांना चर्चा, बैठकीसाठी आमंत्रित केले जात नाही. 

नेहमीच ग्रामस्थांना डावलूनच हौसे, नवसे, गवशांना बोलावण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आणून कोळी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. प्रकल्पाला नवापाडा ग्रामस्थांचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. मात्र, यापुढेही नवापाडा ग्रामस्थांना डावलल्यास न्यायहक्कासाठी  न्यायालयात जाण्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

Web Title: Nuapada village Angry on MMRDA officials to task for calling unrelated people for the necessary survey and measurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.