.. Now language Literature sammelan in Colleges | ..आता महाविद्यालयांमध्ये बहुभाषा साहित्य संमेलन

..आता महाविद्यालयांमध्ये बहुभाषा साहित्य संमेलन

ठळक मुद्देदेशभरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये बहुभाषा संमेलने आयोजित केली जाणारएक वर्ष आणि एक लाख संस्था असे बहुभाषा संमेलनाचे उद्दिष्टकिमान तीन भाषा आणि जास्तीत जास्त दहा भाषांचा संमेलनात समावेश केला जाणार यावर्षीच्या नोव्हेंबरपासून महाविद्यालये, शाळांमध्ये बहुभाषा संमेलन आयोजित केले जाणार

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून देश जोडण्याची चळवळ सरहद संस्थेतर्फे हाती घेण्यात आली. भाषांच्या देवाणघेवाणीतून चळवळीला बळकटी मिळण्याच्या दृष्टीने बहुभाषा साहित्य संमेलनाची संकल्पना प्रत्यक्षात आली. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची ५५० जयंती आणि संत नामदेवांची ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये बहुभाषा संमेलने आयोजित केली जाणार आहेत.
सध्या एक देश, एक भाषा याबाबत देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदी राजभाषा असली तरी विविधतेत एकता असलेल्या भारतात इतर प्रादेशिक भाषांचाही सन्मान झाला पाहिजे, असा मतप्रवाह पहायला मिळत आहे. विविध भारतीय भाषांप्रमाणेच पाली, प्राकृत, संस्कृत आणि मागधी या भाषांमधील साहित्याची देवाणघेवाण झाल्यास भारतीय साहित्य समृध्द होऊ शकते. हाच धागा पकडून सरहद संस्थेने शाळा, महाविद्यालयांमध्ये बहुभाषा संमेलनाचा संकल्प केला आहे.
गुरु नानक, संत नामदेव यांनी आयुष्यभर देश आणि माणसे जोडण्याचे काम केले. गुरु नानक यांचा जन्म १२ नोव्हेंबर १४६९ रोजी झाला, तर संत नामदेवांचा जन्म १२७० मध्ये झाला. यावर्षी गुरु नानक यांची ५५० जयंती तर संत नामदेवांची ७५० वी जयंती साजरी केली जात आहे. संत नामदेवांना १२ हून अधिक भाषा अवगत होत्या. त्यांनी एकता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी देशभर प्रवास केला. दोहोंच्या जयंतीचे औचित्य साधून संमेलनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर बहुभाषा संमेलनाची संकल्पना पुढे आली. भारताच्या विविध प्रांतांमध्ये विविध भाषा बोलल्या जातात. भाषा एकत्र जोडणे आणि त्या माध्यमातून एकता, बंधुभाव प्रस्थापित करण्याचा विचार डोळयांसमोर ठेवून पहिले पहिले बहुभाषा साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी संमेलनाचे अध्यक्ष होते. यावर्षी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे संमेलन पार पडणार होते. मात्र, तेथे तणावाची परिस्थिती असल्याने संमेलन रद्द करण्यात आले. ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी यावर्षीच्या नोव्हेंबरपासून महाविद्यालये, शाळांमध्ये बहुभाषा संमेलन आयोजित केले जाणार आहे.
-------------
एक वर्ष आणि एक लाख संस्था असे बहुभाषा संमेलनाचे उद्दिष्ट आहे. पुण्यातून या चळवळीला सुरुवात होणार आहे. किमान तीन भाषा आणि जास्तीत जास्त दहा भाषांचा संमेलनात समावेश केला जाणार आहे. कथा, कविता, ललित लेखन, परिसंवाद असे संमेलनांचे स्वरुप असेल. संमेलनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील अनुवाद कौशल्याला प्रेरणा दिली जाणार आहे. स्वागताध्यक्ष, आयोजक विद्यार्थ्यांमधूनच निवडले जातील. देशभरातील शाळा, महाविद्यालयांशी याबाबत पत्रव्यवहार सुरु आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: .. Now language Literature sammelan in Colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.