आता दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार इंटरनेटची सेवा; स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:50 IST2025-11-06T12:49:48+5:302025-11-06T12:50:40+5:30
असा करार करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

आता दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार इंटरनेटची सेवा; स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात सामंजस्य करार झाल्यामुळे दुर्गम भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
माहिती तंत्रज्ञानमंत्री ॲड. आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, स्पेसएक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरेन ड्रेयर, स्टार लिंक लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी मनोज लाडवा, महाआयटीचे महाव्यवस्थापक मकरंद कुरतडीकर आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. करारावर लॉरेन ड्रेयर आणि वीरेंद्र सिंग यांनी स्वाक्षरी केली. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांच्या दुर्गम भागांना विशेष फायदा होणार आहे.
स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे. प्रत्येक शाळा, प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, कितीही दुर्गम असो ही भागीदारी ‘फ्युचर-रेडी’ आणि पूर्णपणे जोडलेले महाराष्ट्र घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे ‘डिजिटल इंडिया’च्या ग्रामीण पातळीवरील आदर्श मॉडेल ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या उपक्रमाचा उद्देश राज्यातील पायाभूत सुविधा मार्गांवरही (जसे की समृद्धी महामार्ग, फेरी सेवा, बंदरे, किनारी पोलिस नेटवर्क) उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आहे. तसेच शिक्षण आणि टेलिमेडिसीन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे.
प्रायोगिक टप्प्यातील मुख्य उद्दिष्टे
- शासन व आदिवासी शाळा, आपले सरकार केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे
- आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा
- शिक्षण व आरोग्य सेवेसाठी उच्च-गती इंटरनेटद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे
- राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण व क्षमता-विकास कार्यक्रम राबविणे.
- प्रायोगिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर विस्तारला जाईल, ज्यामुळे महाराष्ट्र उपग्रहाधारित डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय आघाडीवर पोहोचेल.
महत्त्वाकांक्षी डिजिटल महाराष्ट्र मिशनला वेग
- या उपक्रमासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यगटाद्वारे ९० दिवसांचा प्रायोगिक टप्पा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये — ३०, ६० आणि ९० दिवस यानुसार पूर्ण केला जाईल. या प्रगतीचा आढावा दर तिमाहीला मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आहे.
- एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जिच्याकडे जगातील सर्वाधिक दळणवळण उपग्रह आहेत. ही कंपनी भारतात येत आहे आणि महाराष्ट्रासाठी भागीदारी करीत आहे, हा आमच्यासाठी सन्मान आहे. या महाराष्ट्र - स्टारलिंक सहकार्य करारामुळे राज्याच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल महाराष्ट्र मिशनला वेग मिळेल आणि राज्यातील इलेक्ट्रिक वाहने, किनारी विकास आणि आपत्ती प्रतिरोधक क्षमता कार्यक्रमांनाही फायदा होईल. अशा भावनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविल्या.