आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:44 IST2023-05-19T10:39:34+5:302023-05-19T10:44:07+5:30
सध्या बंदीवानांना कॉईन बॉक्सवरून त्यांच्या नातेवाइकांशी आठवड्यातून एकदा आणि तेही दहा मिनिटेच बोलता येते.

आता कैदी करु शकतील घरच्यांना व्हिडीओ कॉल, येरवडा कारागृहात लवकरच सुरुवात
मुंबई : पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंदीवान हे लवकरच त्यांच्या घरच्यांना साधा वा व्हिडीओ कॉलही करू शकतील. बंदीवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदीवानांना भेटण्यासाठी राज्यातील सगळ्याच कारागृहांमध्ये नातेवाइकांची मोठी गर्दी होत असते. बहुतेक बंदीवानांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशावेळी कुटुंबातील एकजण वा दोघेच बंदीवानाच्या भेटीसाठी जाऊ शकतात. शिवाय बंदीवानास त्यांच्या बराकीतून कॉइन बॉक्सपर्यंत न्यावे लागते. ते सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचेही ठरू शकते. मोबाइलवर कॉलद्वारे हा संभाव्य धोका टळू शकेल. बंदीवानास एकाचवेळी कुटुंबातील सगळ्यांशीच बोलता येईल वा त्यांना बघतादेखील येणार आहे. अर्थातच मोबाइल सेट हे कारागृह प्रशासनाच्या ताब्यात असतील व केवळ कॉलसाठी ते बंदीवानांना दिले जाणार आहेत. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर त्याची सुरुवात केली जाणार आहे. सध्या बंदीवानांना कॉईन बॉक्सवरून त्यांच्या नातेवाइकांशी आठवड्यातून एकदा आणि तेही दहा मिनिटेच बोलता येते. शिवाय बंदीवान व त्यांचे नातेवाइक यांना एकमेकांना पाहता येत नाही. आता ही गैरसोय दूर होणार आहे.
या उपक्रमामुळे बंदीवान व त्यांच्या कुटुंबीयांना एकमेकांकडे भावना व्यक्त करता येतील. दोघांवरील ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. टप्प्याटप्प्याने सर्वच कारागृहांमध्ये ही सुविधा दिली जाईल. कुटुंबाचा मोबाइल क्रमांक हा कारागृह प्रशासनाकडे नोंदणीकृत असेल
- अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक (कारागृह)