Jayant Narlikar Raj Thackeray: "डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. नारळीकरांनी मात्र मराठी जनांना विज्ञानकथेची गोडी लावली", अशा भावना व्यक्त करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज ठाकरे यांनी नारळीकर यांच्या संशोधन कार्याला उजाळा देणारी पोस्ट लिहिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, "ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. १९६४ साली वयाच्या २६ व्या वर्षी एका तरुण मराठी शास्त्रज्ञाने आपले गुरु फ्रेड हॉयल यांच्या सोबत गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला आणि यातून विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली."
विश्वनिर्मितीच्या नव्या शक्यता तपासल्या जाताहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे म्हणाले की, "त्यावेळेस बिगबँग थिअरी ही प्रचलित आणि सर्वमान्य थिअरी होती पण त्यालाच नारळीकरांनी आवाहन दिलं आणि यातूनच विश्वनिर्मितीच्या बाबत अनेक नव्या शक्यता आज देखील तपासून बघितल्या जात आहेत."
ही सृष्टी कोणी आणि कशी निर्माण केली?
"आपण कोण, कुठून आलो, ही सृष्टी कोणी आणि कशी निर्माण केली? हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत ज्यावर अनेक शतकं विचार सुरु आहे. सुरुवातीला जेंव्हा कुठलंच सज्जड उत्तर सापडलं नाही तेंव्हा ही सृष्टी कुठल्यातरी शक्तीने घडवली असं मानलं गेलं, आणि हे काही भारतातच नाही तर जगभरात मानलं गेलं", असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
शास्त्रज्ञांना धर्मसत्ता आणि राजसत्तेकडून अहवेलना सोसावी लागली -राज ठाकरे
"मग या सृष्टीच्या नियंताचा शोध घ्या, त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाटच आली होती. युरोपात रेनिसन्सचा काळ आला आणि ज्यातून सगळ्याच कल्पनांना आवाहन दिलं गेलं. अर्थात त्यासाठी शास्त्रज्ञांना तत्कालीन धर्मसत्ता आणि कधी कधी राजसत्तेकडून प्रचंड अहवेलना सहन करावी लागली. पण त्यांची चिकाटी संपली नाही. आणि म्हणूनच आज जग ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहे तिथे पोहचु शकला", असा उल्लेख करत राज ठाकरेंनी एआयबद्दलही भाष्य केले.
"डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही, उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरु होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे. असो", अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
"पण डॉ नारळीकर हे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ होतेच पण त्यांच्या बाबतीत दोन गोष्टी मला खूपच लक्षणीय वाटतात. एक म्हणजे आयुका सारखी संस्था जिथे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्रावर मूलभूत संशोधन केलं जातं. डॉ नारळीकर जेंव्हा १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात परतले तो काळ असा होता जेंव्हा विज्ञानातील मूलभूत संशोधनातील संस्था उभ्या राहत होत्या. स्वतः नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत होते, त्यामुळे कदाचित त्यांना तिथून प्रेरणा मिळाली असावी. आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं आणि त्यांनी तेंव्हा उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रुप वाटतं", अशा भावना राज ठाकरेंनी नारळीकरांबद्दल व्यक्त केल्या.
राज ठाकरे नारळीकरांबद्दल म्हणाले, "डॉ नारळीकरांची दुसरी ओळख म्हणजे ते उत्तम विज्ञान कथा लेखक होते. अमेरिकेत, युरोपात विज्ञानकथांचं आणि त्यातून निघणाऱ्या चित्रपटांचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. अनेकांना त्याची फारशी गोडी नसते , पण नारळीकरांनी मात्र मराठी जनांना विज्ञानकथेची गोडी लावली. नारळीकर स्वतःच म्हणायचे की 'विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं."
"विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्की भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच. डॉ. जयंत नारळीकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली", अशा शब्दात राज ठाकरेंनी नारळीकरांना श्रद्धांजली अर्पण केली.