आता बालभारतीही बोलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:24 IST2020-02-15T06:23:36+5:302020-02-15T06:24:02+5:30
व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातूनशिक्षक-विद्यार्थ्यांशी संवाद

आता बालभारतीही बोलणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ अर्थात बालभारतीही आता कात टाकत आहे. या पार्श्वभूमीवर बालभारतीने ई-लर्निंग साहित्य निर्मितीबरोबरच ई- बालभारती प्रकल्पांतर्गत राज्यातील ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमातून शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्र्थ्यांबरोबरच शिक्षकांशीसुद्धा व्हीसॅट सोल्युशनच्या तंत्रज्ञानाने संवाद साधला जातो. त्यामुळे आता बालभारतीही स्वत: विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधणार आहे.
बालभारतीच्या या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हॅल्युएबल ग्रुप
या व्हीसॅटवर आधारित संवादरूपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येईल. समान आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असून या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा वाढण्यास कशी मदत होईल, त्याचा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याकडे शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
बालभारतीच्या या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून राज्यातील अनेक शाळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. याअंतर्गत एका स्टुडिओद्वारे संपर्क स्थापित केला जातो. या स्टुडिओच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या क्लासरूमद्वारे भौगोलिक भागातील दुर्गम शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना अत्याधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात प्रवाही करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
या शिवाय यातून कोणत्याही एका विषयावर नव्हे तर सर्वच विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदा होईलच, शिवाय शिक्षकांनाही आधुनिक शिक्षण क्षेत्रातील प्रायोगिक व प्रात्यक्षिक पद्धतीने ज्ञानग्रहण करता येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.
आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
विद्यार्थी हे राष्ट्राचे आणि समाजाचे भवितव्य असल्याने केवळ शिक्षणमंत्री म्हणून नव्हे, तर शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. सोबतच मुलांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील अन्य गुणांनाही वाव दिला पाहिजे, ज्यामध्ये कला-क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा समावेश आहे.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री