केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:40 IST2025-05-18T14:37:38+5:302025-05-18T14:40:22+5:30

Shiv Sena Shinde Group News: एकेक करीत अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.

not only uddhav thackeray group but mns also setback office bearers from 7 places including dadra nagar haveli join shinde sena | केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत

केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत

Shiv Sena Shinde Group News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तयारी केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीय पक्षांच्या पातळीवरही सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे ठाकरेंचे एकेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षाच्या गळाला लागत असल्याचे म्हटले जात आहे. यातच केवळ ठाकरे गट नाही, तर मनसेसह अन्य पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसंदर्भात माहिती दिली. पालघर, डहाणू, छत्रपती संभाजीनगर, दादरा आणि नगर हवेली, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, सोलापूर येथील उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक' ही मोहीम पोहोचवायची आहे

गेल्या अडीच वर्षात विकास आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून काम केले. शासन आपल्या दारी द्वारे ५ कोटी लोकांना फायदा झाला. हजारो लोक शिवसेनेमध्ये दाखल होत असून शिवसेना ही संकटकाळात धावून जाणारी संघटना आहे हा विश्वास लोकांच्या मनात आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे नेत आहोत.  विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्याला भरभरून मतांचे दान दिले. त्यामुळे 'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक' ही मोहीम आपल्याला पोहोचवायची आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. 

कोणत्या पक्षातील कोणते पदाधिकारी शिवसेनेत?

पालघरचे माजी आमदार अमित घोडा, काँग्रेस सरचिटणीस जितू पटेल, आगवन गावचे सरपंच रुपजी कौल, विपुल रमण पटेल, संजय धोडी, मनसेचे अनिकेत माच्छी, अमूल पटेल, शोभा खताळ, रिक्षा संघटनेचे जगन्नाथ ठाकूर, संदीप पाटील, रामलीला प्रचार समितीचे पंडित राजू शर्मा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगरचे उमेश वसंत महिरे, दादरा आणि नगर हवेलीचे हेमंत झा, अशोक तिवारी, महेंद्र कटारिया तसेच धुळे जिल्ह्यातील नितीन पाटील, हेमाताई हेमाडे, सरोज कदम, भोला सगरे, सोलापूर जिल्ह्यातील ज्योतिराम मदने, बलभीम पाटील, मनोज नरसाणे, श्रीराम परदेशी, गणेश परदेशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेना पक्षाची दोन शकले झाल्यापासून एकेक करीत सुमारे पन्नास टक्के माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे सुमारे शंभर नगरसेवक होते. त्यापैकी आता ठाकरेंबरोबर सुमारे ४८ नगरसेवक उरल्याचे समजते.

 

Web Title: not only uddhav thackeray group but mns also setback office bearers from 7 places including dadra nagar haveli join shinde sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.