"सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट"; नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 22:09 IST2025-02-04T22:08:04+5:302025-02-04T22:09:52+5:30

काँग्रेस पक्षाला महायुतीच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

Not just one minister entire BJP coalition government is corrupt Nana Patole alleges | "सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट"; नाना पटोलेंचा आरोप

"सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट"; नाना पटोलेंचा आरोप

Nana Patole: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असं नाना पटोले यांनी केली.

"भाजपा युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत पण हे सर्व भाजपाच करत आहे. भाजपाचाच आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का?," असा सवाल नाना पटोले यांनी केला. 

"काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही. राज्यात जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला,  ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुद्द्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील," असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा बंदोबस्त करा! 

"भाजप युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अपमान करु लागले तर राहुल सोलापुरसारखे लोकही त्याच पद्धतीने सरपकारच्या मागे भुंकत असतात. सरकारच्या मानसिकतेचा परिणाम लोकांवरील झाला आहे, म्हणूनच ते महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करु शकतात. कलाकार असला म्हणजे त्याला काय वेगळी शिंगं नाही फुटत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला पायबंद घातलाच पाहिजे," असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Not just one minister entire BJP coalition government is corrupt Nana Patole alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.