हेही ‘सात्विक’ नाही !
By Admin | Updated: December 5, 2014 00:45 IST2014-12-05T00:45:27+5:302014-12-05T00:45:27+5:30
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

हेही ‘सात्विक’ नाही !
सात्त्विक इन्व्हेस्टमेंटच्या संचालकावर गुन्हे दाखल
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्याच्या आरोपावरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमोल ढाके, प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वच्या सर्वच नागपुरातून पळून गेलेले आहेत.
अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये अमरावती रोडवर पुराणिक ले-आऊट (भरतनगर) मध्ये सात्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. आकर्षक व्याज देणाऱ्या अनेक योजनांचे मृगजळ दाखवून ठेवीदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे ढाके आमिष दाखवत होता. तिमाही, सहामाही आणि बारामाही योजनांसोबतच ४२ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचेही तो आमिष दाखवत होता. त्याच्या या गोरखधंद्यात प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी यांचाही सहभाग होता. ते सुद्धा ठेवीदारांना रक्कम गुंतविण्यासाठी प्रवृत्त करीत होते. या सर्वांनी मिळून शेकडो ठेवीदारांकडून वेगवेगळ्या मुदतीच्या कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. गेल्या वर्षभरात अनेक ठेवीदारांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे ठेवीदार आपली रक्कम घेण्यासाठी सात्त्विकच्या कार्यालयात जाऊ लागले. या ठेवीदारांना अमोल ढाके आणि त्याचे साथीदार वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवीत होते.
पोलिसांकडे तक्रारकर्त्यांची गर्दी
ढाके आणि साथीदारांनी काशीकर तसेच अन्य १६ तक्रारदारांची फसवणूक केल्याचा जो गुन्हा दाखल झाला, त्यात फसवणुकीची रक्कम ३३ लाख, १४ हजार रुपये आहे. प्रत्यक्षात हा आकडा अनेकपट अधिक आहे. कारण ढाके आणि कंपनीवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती कर्णोपकर्णी मिळाल्याने तक्रारकर्त्यांची अंबाझरी ठाण्यात गर्दी वाढली आहे. ३० ते ४० जण आपलीही फसवणूक झाल्याचे आज पोलिसांना सांगत होते. या सर्वांना रितसर तक्रार करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
नऊ वर्षात १०० कोटी?
अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये सात्विक कंपनी सुरू केली. एप्रिल २०१४ पर्यंत अर्थात नऊ वर्षात त्याने १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. ठेवीदारांची रक्कम परत करण्याची मुदत पूर्ण होताच त्याने भरतनगरातील गाशा गुंडाळला आणि पसार झाला. अलीकडे तो ठेवीदारांसोबत फोनवरही बोलत नव्हता. गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत. येत्या २४ तासात पीडित ठेवीदारांची संख्या तसेच ढाके आणि कंपनीने हडपलेल्या रकमेचा आकडाही वाढणार आहे. त्यामुळे हा तपास गुन्हेशाखेकडे सोपविला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगताहेत.