"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:38 IST2025-04-16T16:33:49+5:302025-04-16T16:38:35+5:30
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी अमित शाह आमचे नेते असल्याचे म्हटलं.

"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
Sanjay Shirsat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच काळाने दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं. दुसरीकडे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरुन शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा आणि मोदी चालवतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या टीकेला शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे शिवतीर्थवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनीही भेटीत राज ठाकरेंबरोबर निवडणुकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं म्हटलं. यावरुन बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी अमित शाह हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत असं म्हटलं.
"चला आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. त्याचा तुम्हाला काय त्रास आहे. नालायकांनो तुम्ही काश्मीरला जाऊन राहुल गांधींची गळाभेट घ्यायचा प्रयत्न करता. ते तुमच्या पक्षाचे कोण आहेत. त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत होते ना. शरद पवार तुमच्या प्रमुख नाहीत का. म्हणून आम्ही अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनाही मानतो. त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या पक्षाची वाटचाल यशस्वीरित्या पुढे चालू ठेवली आहे. म्हणून आम्हाला अमित शाह हे आमचे नेते आहेत हे सांगायला सुद्धा लाज वाटत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.
इतरांची मदत घेतली तर काय झालं?
"ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतरांची मदत घेतली तर काय झालं? एकनाथ शिंदे हे संवाद ठेवणारे नेते आहेत. ज्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही, ते लोक दुसऱ्यांच्या पक्षात डोक घालण्याचं काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर दिली.