नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत बँक गैरव्यवहाराची चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:04 IST2025-07-16T06:03:50+5:302025-07-16T06:04:05+5:30

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा, सहकार विभागामार्फतही तपास 

North Canara Goud Saraswat Bank to investigate fraud | नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत बँक गैरव्यवहाराची चौकशी करणार

नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत बँक गैरव्यवहाराची चौकशी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गिरगाव शाखेतील यु. बी. इंजिनिअरींग कंपनीचे बंद केलेले खाते मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या बनावट पत्राच्या आधारे उघडण्यात आले. सिग्नेटरी ॲथॉरिटीत बदल करून १.८३ कोटी रुपये इतरत्र वळविण्यात आले. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. तर, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सहकार विभागानेही याची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले.

आ. प्रसाद लाड यांनी सदर बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची लक्षवेधी सूचना मांडून या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी नाडकर्णी दाम्पत्यासह इतर काही व्यक्तींविरोधात एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. यात काही पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असून चौकशी होईपर्यंत पोलिस अधिकारी दीपक दळवी यांना निलंबित करण्याची मागणी आ. प्रवीण दरेकर यांनी केली. 

४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिट
राज्यमंत्री कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी आणि यू. बी. इंजिनिअरिंगचे मुख्य वित्तीय अधिकारी व इतर संबंधित यांनी संगनमत करून २०१८ ते २०२१ यादरम्यान हा घोटाळा केला. चौकशी करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आर्थिक व्यवहार केल्याचा पुरावा आढळला नाही. मात्र, तक्रारीच्या चौकशीस योग्य दिशा दिली नसल्याने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

बँकेचे फ्रीज झालेले १.८३ कोटी रुपये अनधिकृतपणे डी-फ्रीज करून काढण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही बाबा उघड झाल्यावर बँकेने संपूर्ण रक्कम व्याजासहित परत केली. या गैरव्यवहारामुळे बँकेस ५० लाखांचा दंड झाला. बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि त्यांची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून  ४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे कदम म्हणाले.

Web Title: North Canara Goud Saraswat Bank to investigate fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.