कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 07:21 IST2025-11-02T07:20:40+5:302025-11-02T07:21:36+5:30
नोव्हेंबर महिना गुलाबी थंडीविनाच जाणार...

कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नोव्हेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ढगाळ हवामानामुळे तापमान खाली उतरणार नाही. परिणामी, नोव्हेंबर महिना गुलाबी थंडीविनाच जाणार असून, राज्यासह मुंबईतल्या नागरिकांना थंडीसाठी आता डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिवाळीतही पाऊस पडला. हवामानातील वेगवान घडामोडींमुळे ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत पावसाचा अंदाज असून, ढगाळ हवामानामुळे तापमान चढे राहणार आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी कमी नोंदविले जाईल. जिथे कमाल तापमानाचा पारा ३२ असतो. तिथे तो ३० अंश सेल्सिअस असेल. तर किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी अधिक नोंदविले जाईल. जिथे किमान तापमान २० नोंदविले जाते, तिथे ते २२ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल.
थोडक्यात, नोव्हेंबर महिन्यात मुंबईत थंडी पडणार नाही. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी अधिक राहील. जिथे तापमान ३२ असते ते ३४ नोंदविले जाईल. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी अधिक असेल. जिथे किमान तापमान १५ असते ते १७ असेल. दरम्यान, ला निना सक्रिय असल्याने पावसाची शक्यता असून, आकाश ढगाळ राहील, असा अंदाज आहे.
राज्यात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस असण्याची शक्यता आहे. राज्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता, इतरत्र किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल.
-कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ