"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 21:12 IST2025-07-31T21:10:16+5:302025-07-31T21:12:04+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत.

"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
"मशिदीच्या शेजारी हा स्फोट झाला. मला एक टक्काही शक्यता वाटत नव्हती की वेगळा निकाल लागेल. हा निकाल असाच लागणार हे वाटतं होतं. तसाच निकाल लागला?", असे विधान माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. "भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा", असे ते मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेत चव्हाण यांनी तपासाबद्दल गंभीर आरोप केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना २००८ ची आहे. या घटनेला १७ वर्षे झाली आहेत. बॉम्बस्फोट कुणीतरी केला आणि त्यात ६ लोक मारले गेले. १०० लोक जखमी झाले. मला एक टक्काही वाटत नव्हते की वेगळा निकाल लागेल. हा निकाल असाच लागणार हे वाटत होतं; तसाच तो लागला."
अमित शाह यांचे नाव घेत गंभीर आरोप
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "200 ते 250 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. काहींनी साक्ष फिरवली. तपास ज्या दिशेने चालला होता, तसाच हा निकाल लागला आहे. न्यायालयात एनआयएने जशी बाजू मांडली, त्याआधारे निकाल दिला गेला. आरोपींविरोधात पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आरोपींना सोडलं गेलं."
"स्फोट आपोआप झाला का? कट कुणी केला? आरडीएक्स कुणी आणलं? एनआयए अमित शाह यांच्या नेतृत्वात काम करत आहे. त्यामुळे वेगळी काय अपेक्षा ठेवणार; जी माणसं मेली, त्यांच्या कुटुंबीयांना तुम्ही काय सांगणार आहात? अमित शाह यांच्या नेतृत्वात जोपर्यंत या तपास यंत्रणा काम करत आहेत, तोपर्यंत हे असेच निकाल लागणार हे अपेक्षित आहे", असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर केला.
"भगवा दहशतवाद म्हणू नका, तर..."
पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद असा शब्द वापरू नका असेही म्हटले. ते म्हणाले, "माझी हात जोडून विनंती आहे की, भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग आहे. तो वारकऱ्यांच्या झेंड्याचाही रंग सुद्धा भगवाच आहे. त्यामुळे भगवा दहशतवाद असं म्हणू नका. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद किंवा सनातनी दहशतवा म्हणा. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळं महत्त्व आहे. काँग्रेसच्या लोकांनाही माझी विनंती आहे की, भगवा दहशतवाद म्हणू नका", असे भाष्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.