'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:58 PM2020-07-09T17:58:08+5:302020-07-09T17:59:36+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे.

'No one in Maharashtra is so big as to insult Chhatrapati's family', sambhajiraje bhosale | 'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल'

'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल'

Next
ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे.या बैठकीदरम्यान सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहितीही पवारांनी दिली

मुंबई - मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. मात्र, संभाजीराजे यांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर, ही बैठक व्यवस्थितपणे पार पडली असून खासदार संभाजीराजेंनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्त्वाचे, असे म्हणत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला. छत्रपतींनी तिसऱ्या रांगेत स्थान दिलं जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न मराठा समाजाच्या समन्वयकांनी उपस्थित केला. त्यामुळे बैठकस्थळी गोंधळ झाला. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेतली. 

या बैठकीदरम्यान सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहितीही पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं काम मार्गी लागलं हे महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. 

''माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत.  स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे.'', असं ट्विट संभाजीराजेंनी केलं आहे. तसेच, छत्रपती घराण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल, असेही संभाजीराजेंनी म्हटलंय. समाजाने सारथीचा लढा सुरु केला होता, त्याच्या पूर्ततेला सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्त्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचा छत्रपती घराण्यावर असलेला विश्वास जपण्याचा मी प्रयत्न करेल, असेही सर्व शिवभक्तांना उद्देशून संभाजीराजेंनी म्हटले. 

Web Title: 'No one in Maharashtra is so big as to insult Chhatrapati's family', sambhajiraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.