Prakash Ambedkar: “माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा!”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:50 IST2022-04-13T14:40:05+5:302022-04-13T14:50:25+5:30
उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं, पण युतीबाबत बोलायची त्यांची हिंमत झाली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

Prakash Ambedkar: “माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा!”
अकोला – राज्यात २०१९ मध्ये एमआयएमसोबत युती करत भारीप बहुजन महासंघानं वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात निवडणुका लढवल्या. यात एमआयएमला फायदा झाला आणि औरंगाबादमध्ये त्यांचा खासदार निवडून आला. परंतु कालांतराने एमआयएमशी दुरावलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आता नव्या राजकीय मित्राचा शोध सुरू केल्याचं दिसून येते.
अकोल्यात प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी युती संदर्भात एक मोठं वक्त्यव्य केले. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेची(Shivsena) युती करण्यात तयार आहोत. त्यासंदर्भात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी एकदा भेटीसाठी बोलवलंही होतं. शिवसेनेने भाजपाशी नातं तोडलं आहे तर आम्हाला सोबत घ्यावं. मात्र त्यांची काही हिंमत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस(Congress) समोरही युतीचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्या सोबत फिरायला तयार आहेत मात्र लग्नाला कोणीही तयार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत विधान केले होते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लीम लीग यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचं त्यांनी जाहीर केले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना या सेक्युलर पक्षासोबत युती करण्यास आमची तयारी असल्याचं आंबेडकर म्हणाले होते.
काँग्रेस-शिवसेना यांच्यासोबत युती करण्यावर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? @VBAforIndia#PrakashAmbedkarpic.twitter.com/UOXz8Qecd7
— Lokmat (@lokmat) April 13, 2022
महापालिका निवडणुकीत होणार का युती?
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. कारण भाजपाशी युती तोडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. त्यात मुंबई महापालिकेत अद्यापही काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवण्याचं जाहीर केले नाही. त्यामुळे शिवसेना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का? हे पाहणं गरजेचे आहे.