घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा
By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 20:48 IST2021-01-05T20:45:37+5:302021-01-05T20:48:19+5:30
महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही

घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा
मुंबई
देशात सध्या पाच राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप 'बर्ड फ्लू'ची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे.
"महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही", असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयला सांगितलं. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू'मुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्येही 'बर्ड फ्लू'ची प्रकरणं समोर आली आहेत.
केरळच्या कोझिकोड येथील दोन पोल्ट्री फार्मध्ये 'बर्ल्ड फ्लू' पसरल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढल्यानं हायअलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर केरळमध्ये 'बर्ड फ्लू'ला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 'बर्ड फ्लू'ची फैलाव माणसांमध्येही होण्याची दाट शक्यता असते. याआधी २००६ साली महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा फैलाव झाला होता. त्यावेळी हजारो कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण झाली होती.