प्रकृती न सुधारल्याने 'त्या' विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार, 500 उठाबशांचं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:32 IST2017-12-15T13:51:13+5:302017-12-15T14:32:29+5:30
500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तिला मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून आता मुलीवर पुढील उपचार मुंबईच्या केईएम रूग्णालयात होणार आहेत.

प्रकृती न सुधारल्याने 'त्या' विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार, 500 उठाबशांचं प्रकरण
कोल्हापूर: 500 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचा सर्व वैद्यकिय खर्च महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्यामुळे या मुलीवरील सर्व वैद्यकिय चाचण्या आता मुंबईत होणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून आता मुलीवर पुढील उपचार मुंबईच्या केईएम रूग्णालयात होणार आहेत. यापूर्वी आज विधानसभेत चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांच्यावर कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी केली होती.
सीपीआर रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. 11) सायंकाळी उपचारासाठी या मुलीला आणण्यात आले. याठिकाणी तिचे सी.टी.स्कॅन, एमआरआय आणि सर्व शारिरीक तपासण्या करण्यात आल्या. पण, काही निदान झाले नाही. त्यामुळे न्युरो फिजिथेरपीस्ट डॉ. औरंगाबादकर यांनीही तपासणी केली. पण, कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दूपारी तिला रुग्णवाहिकेमधून मुंबईला नेण्यात आले. विजया चौगुले यांच्यासमवेत तिची आजी पार्वती चौगुले, वडिल निवृत्ती चौगुले व नातेवाईक गेले आहेत.
भोतोलीतील या मुलीला गृहपाठाच्या वही घरी विसरली म्हणून संशयित शिक्षिका अश्विनी देवण यांनी 500 उठाबशा काढण्याची शिक्षा 24 नोव्हेंबरला कानूर येथे शाळेत दिली. विजयाने कशातरी 300 उठाबशा काढल्या. पण, त्यानंतर तिची प्रकृति बिघडली. प्रथम तिच्यावर गडहिंग्लज येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सीपीआर रुग्णालयाकडे उपचारासाठी आणण्यात आले होते.
विजया चौगुले या मुलीचे निदान स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्यावर ‘व्हीडीओ-ईईजी’नुसार अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकिय चाचण्या केईएम रुग्णालयामध्ये होणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बोलणे झाले आहे.
-डॉ. जयप्रकाश रामानंद,
प्रभारी अधिष्ठाता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.