उबाठा, मविआचे सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही; मंत्री नितेश राणेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:42 IST2025-02-13T16:38:15+5:302025-02-13T16:42:04+5:30

राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांमध्ये एक रुपयांचाही निधी देणार नाही, असे विधान केले आहे. 

Nitesh Rane's statement: Will not give even a single rupee of funds to the villages where the sarpanch of Shiv Sena UBT and Maha Vikas Aghadi | उबाठा, मविआचे सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही; मंत्री नितेश राणेंचं विधान

उबाठा, मविआचे सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही; मंत्री नितेश राणेंचं विधान

Nitesh Rane Statement: 'या वर्षीचा निधी संपला की, ३१ मार्चनंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार. जिथे जिथे उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही', असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला. कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असे विधान केले.   

नितेश राणे काय म्हणाले?

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही."

मविआचा सरपंच असलेल्या गावात निधी देणार नाही -नितेश राणे

"मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढा. जिथे जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही", असे विधान नितेश राणे यांनी केले. 

"कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा; भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचं राखून ठेवत नाही. त्याची चिंता करू नका. हे भाषण ऐकून उरले सुरले कोण असतील, तर आताच सांगा. चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेतो. पुढची तारीख बुक करून टाकू", असे नितेश राणे म्हणाले.

आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे -नितेश राणे

"३१ मार्च संपू दे. या वर्षीच्या निधीचा विषय संपला की, पुढच्या वर्षी याद्या घेऊन बसणार. गावांची नावे घेऊन बसणार. महायुतीचा झेंडा दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही", असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

Web Title: Nitesh Rane's statement: Will not give even a single rupee of funds to the villages where the sarpanch of Shiv Sena UBT and Maha Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.