Nilesh Rane:'संजय राऊत यांचा काळा पैसा बाहेर आला, आता अटक होणारच'- निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:49 IST2022-04-05T16:45:19+5:302022-04-05T16:49:04+5:30
Nilesh Rane on Sanjay Raut: ' संजय राऊत म्हणतात हा मेहनतीचा पैसा आहे, पण संजय राऊत मेहनतीचा पैसा कुठून आणणार? राऊत 'सामना'मध्ये काम करतात, तिथून हा पैसा येतो का?'

Nilesh Rane:'संजय राऊत यांचा काळा पैसा बाहेर आला, आता अटक होणारच'- निलेश राणे
मुंबई: आज महाराष्ट्रात मोठया घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या कारवाईनंतर भाजपचे नेते यावर आपापल्या प्रतिक्रया देत आहेत. भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
'आता अटक होणारच...'
मीडियाशी संवाद साधताना निलेश राणे म्हणतात की, 'संजय राऊत हा चोर आहे. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी त्यांची सुटका होणार नाही. राऊतांचा काळा पैसा बाहेर आला आहे. आता त्यांना अटक होणारच. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी आयकराचे पैसे बुडवले होते, तेव्हा संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत द्यावे लागले होते. ते पैसे कशासाठी होते, तेव्हा काय संजय राऊत यांना वारीत पकडलं होतं का?', असा सवाल त्यांनी केला.
'सामनातून पैसे येतो का?'
ते पुढे म्हणाले, 'ईडीला पैशांचा माग (ट्रेल) सापडला असेल, त्यानुसारच ही कारावाई झाली. संजय राऊत यांना नोटीस देऊनही ते ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. आता ते अशी कोणतीही नोटीस आलीच नाही, असे सांगत आहेत. मात्र, ईडीच त्यांना किती नोटीस पाठवल्या होत्या, हे जाहीर करेल. संजय राऊत म्हणतात हा मेहनतीचा पैसा आहे, पण संजय राऊत मेहनतीचा पैसा कुठून आणणार? राऊत 'सामना'मध्ये काम करतात, तिथून हा पैसा येतो का?, असा सवालही निलेश राणे यांनी विचारला.