दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:09 PM2024-07-10T16:09:07+5:302024-07-10T16:12:22+5:30

NCP SP MP Amol Kolhe News: आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून, यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

ncp sp mp amol kolhe reaction over vidhan sabha election and bjp mahayuti strategy | दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा

दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा

NCP SP MP Amol Kolhe News: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. परंतु, विरोधकांनी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला. यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीने हजेरी लावली नाही. यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून, यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा. मागेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री यांचा व्हिडीओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे, यामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे समजणे गरजचे आहे. सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 

महायुती सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी

विरोधकांना राज्यात अशांतता राहावी, असे वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यावर बोलताना, भाजपा सरकारमध्ये नावे बदलणे, हेच धोरण दिसत आहे. नावे बदलून शहरात पाणी साचायचे थांबत नाही, विमानतळाचे छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे, अशी टीका अमोल कोल्हेंनी केली. 

दरम्यान, आगामी विधानसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवली जाणार होती. परंतु, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाण्याची शक्यता आहे. यावर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होती. दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आणि प्रयत्न आहे. तसेच हा महायुतीचा अंतर्गत मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
 

Web Title: ncp sp mp amol kolhe reaction over vidhan sabha election and bjp mahayuti strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.