“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:37 IST2025-12-17T16:37:30+5:302025-12-17T16:37:30+5:30

NCP SP MP Supriya Sule News: ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

ncp sp group mp supriya sule reaction on farmer issue in chandrapur | “किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

NCP SP MP Supriya Sule News: अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारांना तब्बल ७४ लाख रुपयांची परतफेड करावी लागली. कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती, वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. अवैध सावकारांच्या क्रूर छळाचा हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथूर गावात उघडकीस आला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. 

रोशन शिवदास कुळे असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याने दुग्धव्यवसायासाठी १५ ते २० गायी खरेदी केल्या. मात्र लम्पी आजाराने काही जनावरे दगावल्याने व्यवसाय तोट्यात गेला. अडचणीत सापडलेल्या रोशनने ब्रह्मपुरीतील काही अवैध सावकारांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र चार ते पाच जणांच्या टोळीने अवाढव्य व्याज आकारत दमदाटी सुरू केली. कर्ज फेडण्यासाठी रोशनने दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेतीही विकली; मात्र व्याजाचा डोंगर वाढतच राहिला व अखेर त्याला आपली किडनी विकावी लागली. यावरून सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना नाडणाऱ्या खासगी सावकारांना ‘कोपरापासून ढोपरापर्यंत’ सोलून काढायची घोषणा केली होती. त्यानंतर मुजोर खासगी सावकारांच्या विरोधात कठोर कारवाया करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. राज्यातील शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने रक्षण करणारे, त्यांच्या अडीअडणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे सरकार एकेकाळी महाराष्ट्रात अस्तित्वात होते. परंतु सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणींची अक्षरशः परीसीमा झाली असून त्यांच्यावर किडन्या विकण्याची वेळ आली. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून अखेर आपली किडनी विकून कर्ज काही प्रमाणात फेडल्याची घटना घडली. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी

माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, कृपया या घटनेची गांभीर्याने दखल घ्या. अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्याला तातडीने आर्थिक मदत देऊन उभे करण्याची गरज आहे. जर त्याला आपण आता आर्थिक आधार दिला नाही, तर नाईलाजाने तो पुन्हा खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकेल. यातून मोठे आर्थिक, सामाजिक प्रश्न उद्भवू शकतील. म्हणून आपण तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करुन ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

दरम्यान, यासोबतच सध्या  राज्यातील काही भागांमध्ये खासगी सावकारांचे प्रताप वाढले असून शेतकरी नाडला जात आहे. आपण खासगी सावकारीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी. यासोबतच शेतकऱ्यांपर्यंत सहज पद्धतीने पोहोचेल, त्यांना आधारभूत होईल अशा वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करावेत, असेही त्या म्हणाल्या.

 

Web Title: ncp sp group mp supriya sule reaction on farmer issue in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.