जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; अजितदादा गटाला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:19 IST2025-03-14T09:19:18+5:302025-03-14T09:19:56+5:30
NCP SP Group Supriya Sule News: गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. यातच सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट; अजितदादा गटाला लगावला टोला
NCP SP Group Supriya Sule News: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न चर्चेत आला आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. यातच जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.
जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज आहेत हे नक्की. मला नागपूरला त्यांनी एकदा बोलून दाखवले होते की, मुश्रीफ साहेब माझे मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे व हे सर्व टिकून राहणे फार अवघड आहे, याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावे लागेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला होता. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट
मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आताच काही वेळापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेत एक तास चर्चा केली. राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केले आहे. इतकी मोठी संघटना इतका मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला. तर दुसरीकडे, आजकाल वर्दीची भीतीच राहिली नाही. महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यामधील डेटाच सांगतो की, किती मोठी गुन्हेगारी वाढली आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम करून रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटात सामील झाले. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. तुम्हालाच माझ्यापेक्षा चांगले माहिती की नेमका प्रवेश का केला आहे. पुण्याचे पालकमंत्री आता बीडचे पालकमंत्री आहेत, त्यांनी एक वर्षाची चौकशी लावली आहे. आमची मागणी आहे की, पारदर्शकपणे ही सगळी चौकशी झाली पाहिजे.