“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:57 IST2025-11-23T17:57:44+5:302025-11-23T17:57:44+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: सध्याच्या भाजपाने सुसंस्कृपणाची कास सोडली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
NCP SP Group MP Supriya Sule News:भाजपाने सुरू केलेला फोडाफोडाचा नवा ट्रेंड लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक आहे. धमक्यांची भाषा बोलणाऱ्या सरकारवर निवडणूक आयोगाचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगावरच्या श्रद्धेला तडा जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपाने आणलेला पळवापळवी आणि फोडाफोडीचा ट्रेंड लोकशाही आणि संविधानाच्या अस्तित्वासाठी घातक आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुसंस्कृत राजकारणाचे बोट सोडलेल्या भाजपाने अनैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या. विरोधकांना कोर्ट कचेऱ्यात गुंतवून भाजपा सोयीचे राजकारण करत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष फोडला, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारला नैतिक कर्तव्यांचा विसर पडला आहे
राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. मात्र कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधांवर वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी आणि आत्महत्या वाढत असताना आरोग्य, शिक्षणासाख्या मुलभूत प्रश्नांशी सरकारला देणेघेणे उरलेले नाही. या सरकारला नैतिक कर्तव्यांचा विसर पडला आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, अरुण जेटली यांच्या काळात भाजपा सुसंस्कृपणामुळे ओळखला जायचा. मतभेद असतानाही राजकारणात सीमा ओलांडायची नसते. मात्र, सध्याच्या भाजपाने या सुसंस्कृपणाची कास सोडली आहे. संसद गाजवणारा एकही वक्ता आज भाजपाकडे शिल्लक राहिलेला नाही. वागण्या-बोलण्यात मर्यादा ठेवणाऱ्या भाजपातला सुवर्णकाळ संपला आहे, अशी टीका त्यांनी केली.