बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:28 IST2024-12-25T12:28:02+5:302024-12-25T12:28:13+5:30
NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतला खरा मास्टरमाईंड कोण आहे, त्याला समोर आणले पाहिजे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की, सहा तारखेला कोणी फोन केला, त्याचे कॉल डिटेल्स काढा. जो चौथा आरोपी आहे त्याचा सीडीआर काढा, मग सर्व मिळेल. नाशिकमध्ये गर्लफ्रेंडला फ्लॅट दिले हे तपास करा. यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, आयकर किती भरला हे तपासा आणि प्रशासन यात जबाबदार आहे. जे आरोपी आहेत त्यांचा CDR काढा. आपली पोलीस यंत्रणा त्या बाबतीत तत्पर आहे, यातील मास्टरमाईंड शोधला पाहिजे हीच माझी मागणी आहे. पोलीस अधीक्षकांकडे मागणी आहे की, यातील दोषी पोलिसांचा CDR काढा, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करा. परळीतील डॉक्टरला विनाकारण गोवले जात आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.
बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा
संतोष देशमुख यांच्या अंगावर ५६ जखमा आहेत. त्यांनी असा काय गुन्हा केला होता की त्याला एवढे मारले. ९ तारखेला सरपंचाच्या भावाला कोण कोण बोलले. पीआयला कुणाचे फोन आले हे सगळे सी डी आर मध्ये आहे ते काढा. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरेच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजितदादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते बीड येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेत आहे. महाविकास आघाडीचे नेते या प्रकरणी महायुतीवर टीका करत आहेत.